Add parallel Print Page Options

दावीद अनेक युध्दे जिकंतो

यानंतर दावीदाने पलिष्ट्यांचा पराभव केला आणि त्यांच्या राजधानीच्या शहरावरील त्यांची सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली. मवाबातील लोकांचाही त्याने पराभव केला. त्या सर्वांना त्याने जमिनीवर पडून रहायला लावले आणि दोरीच्या सहाय्याने त्यांच्या रांगा केल्या त्यापैकी दोन रांगांतील लोकांना ठार केले आणि तिसऱ्या रांगेतील लोकांना जीवदान दिले. अशाप्रकारे मवाबातील हे लोक दावीदाचे अंकित बनले. त्यांनी दावीदाला खंडणी दिली.

रहोबचा मुलगा हजर हा सोबाचा राजा होता. फरात नदीजवळच्या आपल्या जमिनीचा ताबा घ्यायला, तिची हद्द निश्चित करायला दावीद तिकडे गेला तेव्हा त्याने या हददेजरचा पराभव केला. सतराशे घोडेस्वार आणि वीसहजारांचे पायदळ त्याने हददेजर कडून बळकावले. रथाचे शंभर घोडे वगळता सर्व घोड्यांना त्याने कुचकामी करुन टाकले.

दिमिष्कामधील अरामी लोक हददेजरच्या मदतीला आले. त्या बावीस हजार अरामींनाही दावीदाने ठार केले. मग त्याने दिमिष्कातील अरामात आपली ठाणी बसवली. हे अरामी लोकही दावीदाचे अंकित झाले आणि त्यांनी खंडणी आणली. दावीदाला परमेश्वराने तो जाईल तेथे यश दिले.

हददेजरच्या सैनिकांकडील सोन्याच्या ढाली दावीदाने ताब्यात घेऊन त्या यरुशलेमला आणल्या हददेजरच्या ताब्यातील बेटा आणि बेरोथा (हददेजरची नगरे) येथील अनेक पितळी वस्तुही दावीदाने आणल्या.

हमाथचा राजा तोई याने, दावीदाने हददेजरच्या संपूर्ण सैन्याचा पाडाव केल्याचे ऐकले. 10 तेव्हा त्याने आपला मुलगा योराम याला राजा दावीद याच्याकडे पाठवले. हददेजरशी लढाईकरुन त्याचा पाडाव केल्याबद्दल योरामने त्याचे अभिनंदन करुन त्याला आशीर्वाद दिले. (हददेजरने यापूर्वी तोईशी लढाया केल्या होत्या) योरामने सोने, चांदी आणि पितळेच्या भेटवस्तू दावीदासाठी आणल्या होत्या. 11 दावीदाने त्या स्वीकारुन परमेश्वराला अर्पण केल्या. या आधीच्या समार्पित वस्तूंबरोबरच त्या ठेवून दिल्या. आपण पराभूत केलेल्या राष्ट्रामधून दावीदाने लूट आणलेली होती. 12 दावीदाने अरामी, मवाबी, अम्मोनी, पलिष्टी आणि अमालेकी यांचा पराभव केला. रहोबचा मुलगा, सोबाचा राजा हददेजर याचा पराभव केला. 13 क्षार खोऱ्यातील अठरा हजार अरामींचा पाडाव करुन तो परत आला तेव्हा त्याचा जयजयकार झाला. 14 अदोम मध्ये त्याने शिपायांची ठाणी बसवली. अदोमच्या सर्व प्रांतात अशी ठाणी बसवली. अदोमलोक त्याचे अंकित झाले. जेथे जाईल तेथे परमेश्वराने दावीदाला विजय मिळवून दिला.

दावीदाचे राज्य

15 दावीदाची सत्ता सर्व इस्राएलवर होती. त्याने प्रजेला न्यायाने धर्माने वागवले 16 सरूवेचा मुलगा यवाब सेनापती होता. अहीलुदाचा मुलगा यहोशाफाट हा अखबारनवीस होता. 17 अहीटुबाचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे याजक होते. सराया कार्यवाह होता. 18 यहोयादचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी [a] यांचा प्रमुख होता. दावीदाची मुले महत्वाचे नेते होते.

Footnotes

  1. 2 शमुवेल 8:18 करेथी आणि पलेथी हे दावीदाचे खास अंगरक्षक. जुन्या आर्मेक भाषांतरात यांचा उल्लेख “धनुर्धर आणि दगडफेक करणारे” असा आहे. अचूक शिरसंधान करणारे, नेमबाजी करणारे असा अर्थ घेता येईल.