Add parallel Print Page Options

जगाची सुरवात

देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती; पृथ्वीवर काहीही नव्हते. अंधाराने जलाशय झाकलेले होते; आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता.

पहिला दिवस-प्रकाश

नंतर देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश चमकू लागला. देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे. नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला. देवाने प्रकाशाला “दिवस” व अंधाराला “रात्र” अशी नावे दिली.

संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला पहिला दिवस.

दुसरा दिवस—आकाश

नंतर देव बोलला, “जलांस दुभागण्याकरिता जलांच्या मध्यभागी अंतराळ होवो.” तेव्हा देवाने अंतराळ केले आणि अंतराळावरच्या व खालच्या जलांस वेगळे केले. देवाने अंतराळास “आकाश” असे नांव दिले. संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला दुसरा दिवस.

तिसरा दिवस—कोरडी भूमि व हिरवळ

नंतर देव बोलला, “अंतराळाखालील पाणी एकत्र गोळा होवो व कोरडी जमीन दिसून येवो.” आणि तसे घडले, 10 देवाने कोरड्या जमिनीस “भूमि” आणि एकत्र झालेल्या जलसंचयास “समुद्र” अशी नावे दिली. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.

11 मग देव बोलला, “गवत, बीज देणाऱ्या वनस्पती आणि फळे देणाऱ्या वनस्पती पृथ्वीवर वाढोत. फळझाडे बिया असलेली फळे तयार करतील आणि प्रत्येक वनस्पती आपल्या जातीच्याच बिया तयार करील अशा वनस्पती पृथ्वीवर वाढोत.” आणि तसे झाले. 12 गवत, आपापल्या जातीचे बीज देणाऱ्या वनस्पती आणि आपापल्या जातीची फळे देणारी व त्या फळातच आपापल्या जातीचे बीज असणारी फळ झाडे भूमीने उपजविली. देवाने पाहिले की हे चांगले आहे.

13 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला तिसरा दिवस.

चौथा दिवस—सूर्य, चंद्र व तारे

14 मग देव बोलला “दिवस व रात्र ही वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योति होवोत व त्या विशेष चिन्हे, आणि विशेष मेळावे, ऋतू, दिवस, आणि वर्षे दाखविणाऱ्या होवोत. 15 पृथ्वीला प्रकाश देण्यासाठी आकाशात त्या ज्योति होवोत.” आणि तसे झाले.

16 देवाने दोन मोठ्या ज्योति निर्माण केल्या. दिवसावर सत्ता चालविण्यासाठी मोठी ज्योति सूर्य आणि रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी लहान ज्योति, चंद्र, आणि त्याने तारेही निर्माण केले. 17-18 देवाने त्या ज्योति पृथ्वीवर प्रकाश पाडण्यासाठी आणि दिवसावर व रात्रीवर सत्ता चालविण्यासाठी आकाशात ठेवल्या. त्या ज्योतींनी प्रकाश व अंधार वेगळे केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.

19 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला चौथा दिवस.

पाचवा दिवस—मासे व पक्षी

20 मग देव बोलला, “जलामध्ये जीवजंतूचे थवेच्या थवे उत्पन्न होवोत. आणि पृथ्वीवर आकाशात पक्षी उडोबागडोत.” 21 समुद्रातील प्रचंड जलचर म्हणजे पाण्यात फिरणारे व अनेक जातीचे व प्रकारचे जलप्राणी देवाने उत्पन्न केले. तसेच आकाशात उडणारे निरनिराळ्या जातीचे पक्षीही देवाने उत्पन्न केले आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.

22 देवाने त्यांना आशीर्वाद दिला, “फलद्रूप व्हा, वाढा, समुद्रातील पाणी व्यापून व भरुन टाका आणि पक्षी बहुगुणित होवोत व पृथ्वी व्यापून टाकोत.”

23 संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली हा होता पाचवा दिवस.

सहावा दिवस—जमिनीवरील प्राणी व मनुष्य प्राणी

24 मग देव बोलला, “निरनिराळया जातीचे पशू, मोठे प्राणी वेगवेगळ्या जातीचे सरपटणारे व रांगणारे लहान प्राणी असे जीवधारी प्राणी पृथ्वीवर उत्पन्न होवोत. ते आपापल्या जातीचे अनेक प्राणी निर्माण करोत.” आणि तसे सर्व झाले.

25 असे देवाने वनपशू, पाळीव जनावरे, सरपटत जाणारे लहान प्राणी व वेगवेगळया जातीचे जीवधारी प्राणी निर्माण केले. आणि देवाने पाहिले की हे चांगले आहे.

26 मग देव बोलला, “आपण आपल्या प्रतिरूपाचा आपल्या सारखा मनुष्य निर्माण करु; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, सर्व वनपशू, मोठी जनावरे व जमिनीवर सरपटणारे सर्व लहान प्राणी यांच्यावर ते सत्ता चालवितील.”

27 तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली. 28 देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.”

29 देव म्हणाला, “धान्य देणाऱ्या सर्व वनस्पती आणि आपापल्या फळामध्येच वृक्षाचे बीज असलेली सर्व फळझाडे मी तुम्हांस दिली आहेत. ही तुम्हांकरिता अन्न होतील. 30 तसेच पृथ्वीवरील सर्व पशू, आकाशातील सर्व पक्षी आणि जमिनीवर सरपटत जाणारे सर्व प्राणी यांच्याकरिता अन्न म्हणून मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत.” आणि सर्व तसे झाले.

31 आपण केलेले सर्वकाही फार चांगले आहे असे देवाने पाहिले.

संध्याकाळ झाली व नंतर सकाळ झाली. हा झाला सहावा दिवस.