A A A A A
Bible Book List

निर्गम 38 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

होमार्पणाकरता वेदी

38 मग बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनविली; ती साडेसात फूट लांब, साडेसात फूट रुंद व साडेचार फूट उंच अशी केली. त्याने तिच्या प्रत्येक कोपऱ्यास एक याप्रमाणे चार शिंगे बनविली व ती कोपऱ्यांना अशी जोडली की वेदी व शिंगे एकाच अखंड तुकड्यांची बनविलेली दिसू लागली; त्याने ती पितळेने मढविली. मग त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, कांटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनविली. मग त्याने वेदीसाठी पितळेची पडद्यासारखी जाळी बनविली व ती वेदी भोवतीच्या काठाखाली अशी बसवली की ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली. मग त्याने पितळेच्या जाळीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी चार गोल कड्या केल्या; त्यांच्यात दांडे घालून वेदी वाहून नेण्याकरता त्या उपयोगी होत्या. मग त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते पितळेने मढविले. वेदी उचलून वाहून नेण्याकरता तिच्या बांजूच्या गोल कड्यात त्याने दांडे घातले; वेदीच्या चारही बाजूस फव्व्या लावून ती मध्यभागी पोकळ ठेवली.

दर्शन मंडपाच्या दारापाशी सेवा करण्याऱ्या स्त्रियांनी अर्पण म्हणून आणलेल्या पितळी आरशांचे पितळ घेऊन त्याने गंगाळ व त्याची बैठक बनवली.

पवित्र निवास मंडपाभोक्तीचे अंगण

मग त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या पडद्यांची पन्नास वार लांबीची एक कनात त्याने केली. 10 तिला वीस पितळी बैठक असलेल्या वीस खांबाचा आधार दिलेला होता; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. 11 अंगणाच्या उत्तर बाजूलाही पन्नास वार लांबीची पडद्यांची कनात होती व तीही वीस पितळी बैठक असलेल्या वीस खांबावर आधारलेली होती; खाबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या.

12 अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पंचवीस वार लांबीची कनात होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा खुर्च्या होत्या; ह्या खांबाच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या;

13 पूर्वेकडील रुंदीची बाजू पंचवीस वार लांब होती; 14 अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला साडे सात वार लांबीची कनात होती; तिच्या करता तीन खांब व तीन खुर्च्या होत्या; 15 अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही अगदी तशीच होती. 16 अंगणाच्या सभोवतालचे सर्व पडदे कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे होते. 17 खांबाच्या खुर्च्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढविली होती; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते.

18 अंगणाच्या फाटकाचा पडदा निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता; त्यावर नक्षी विणलेली होती; तो दहा वार लांब व अडीच वार उंच होता; ही उंची अंगणाच्या सभोवतीच्या कनातीच्या उंचीइतकी होती. 19 तो पडदा पितळेच्या चार खुर्च्या असलेल्या चार खांबावर अधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनविलेल्या होत्या; खांबाची वरची टोके चांदीने मढविली होती. 20 पवित्र निवास मंडपाच्या आणि अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व मेखा पितळेच्या होत्या.

21 मोशेने लेवी लोकांना, पवित्र निवास मंडप म्हणजे कराराचा मंडप तयार करण्याकरता लागलेल्या सर्व सामानाची यादी करण्यास सांगितले होते; अहरोनाचा मुलगा इथामर त्याच्यावर ती जबाबदारी प्रमुख म्हणून सोपविलेली होती.

22 ज्या ज्या वस्तू करण्याविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती त्या सर्व वस्तू यहुदा वंशातील हराचा नातू म्हणजे उरीचा मुलगा बसालेल याने बनविल्या; 23 तसेच त्याला मदतनीस म्हणून दान वंशातील अहिसामाख याचा मुलगा अहलियाब हा होता; तो सर्व प्रकारचे कोरीव काम करणारा कुशल कारागीर होता; तो विणकाम व निव्व्या, व जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या तलम कापडावर कशिदा काढण्याचा कामात तरबेज होता.

24 लोकांनी पवित्रस्थानाकरता परमेश्वराला अर्पण केलेले सोने सुमारे दोन टनाहून जास्त होते. [a]

25 लोकांपैकी ज्यांची नोंद करण्यात आली त्या एकूण लोकांनी अर्पण केलेली चांदी पावणेचार टनाहून [b] अधिक होती. 26 वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि प्रत्येकाला एक बेका चांदी (म्हणजे पवित्र स्थानाच्या अधिकृत मापाप्रमाणे “अर्धा शेकेल” चांदी) कर म्हणून द्यावी लागली. 27 त्यांनी ती चांदी पवित्रस्थानाकरिता शंभर खुर्च्या व अंतरपटाच्या खुर्च्या करण्यासाठी वापरली; त्यांनी प्रत्येक खुर्चीसाठी पंचाहत्तर पौंड चांदी [c] वापरली. 28 बाकची पन्नास पौंड चांदी [d] आकड्या बांधपट्ट्या आणि खांबांना मढविण्यासाठी लागली.

29 साडे सव्वीस टनाहून अधिक [e] पितळ परमेश्वरासाठी देण्यात आले. 30 त्या पितळेचा दर्शनमंडपाच्या प्रवेश दाराजवळील खुर्च्या, वेदी तिची उपकरणे व तिची जाळी ह्या करता; 31 त्याचप्रमाणे अंगणाच्या कनातीच्या खांबांच्या खुर्च्या, प्रवेशद्वारावरील पडद्यांच्या खांबांच्या खुर्च्या, तसेच पवित्र निवास मंडप अंगणाच्या चारही बाजूस लागणाऱ्या मेखा बनविण्यासाठी उपयोग झाला.

Footnotes:

  1. निर्गम 38:24 जास्त होते म्हणजे शब्दश: ते पवित्र स्थानाच्या वजनाच्या चलनाप्रमाणे, “एकोणतीस किक्कार व सातशे तीस शेकेल” एवढे होते.
  2. निर्गम 38:25 पावणेचार टनाहून म्हणजे ती, “पवित्र स्थानाच्या अधिकृत मापाप्रमाणे” शंभर किक्कार व एक हजार सातशे पंचाहत्तर शेकेल भरली.”
  3. निर्गम 38:27 पंचाहत्तर पौंड चांदी म्हणजे “एक किक्कार” चांदी.
  4. निर्गम 38:28 पन्नास पौंड चांदी म्हणजे पवित्र स्थानाच्या अधिकृत मापाप्रमाणे “एक हजार सातशे पंचाहत्तर शेकेल” चांदी.
  5. निर्गम 38:29 साडे सव्वीस टनाहून अधिक म्हणजे “सत्तर किक्कार व दोन हजार चारशे शेकेल” एवढे.
  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes