A A A A A
Bible Book List

मत्तय 3 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे कार्य

त्या दिवसांत बाप्तिस्मा करणारा योहान आला आणि यहूदीयाच्या वैराण प्रदेशात उपदेश करू लागला; तो म्हणाला, “तुमची अंतःकरणे व जीवने वाईटपणाकडून चांगुलपणामध्ये बदला कारण स्वर्गाचे राज्य जवळ येत आह्रे” यशया हा संदेष्टा ज्याच्याविषयी बोलत होता तो हाच बाप्तिस्मा करणारा योहान. त्याविषयीचे यशयाचे भविष्य असे होते:

“वैराण प्रदेशात एक मनुष्य ओरडून सांगत आहे;
‘प्रभु देवासाठी मार्ग तयार करा,
    त्याच्या वाटा सरळ करा.’”

योहानाचे कपडे उंटाच्या केसांपासून बनविलेले होते. कातड्याचा कमरपट्टा त्याच्या कमरे भोवती होता. अन्न म्हणून योहान टोळ आणि रानमध खात असे. लोक योहानाचा उपदेश ऐकण्यास जात होते. यरूशलेम, सर्व यहूदीया प्रांत आणि यार्देन नदीच्या भोवतालच्या प्रदेशातून लोक येत होते. आपण केलेली पापे लोक त्याला सांगत होते आणि योहान त्यांना यार्देन नदीत बाप्तिस्मा [a] देत होता.

योहान जेथे लोकांना बाप्तिस्मा देत होता तेथे अनेक परूशी [b] आणि सदूकी [c] आले. जेव्हा योहानाने त्यांना पाहिले तेव्हा तो त्यांना म्हणाला, “अहो, सापाच्या पिल्लांनो, देवाचा जो राग ओढवणार आहे त्याच्यापासून दूर पळण्याचे तुम्हांला कोणी सुचविले? म्हणून पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या. अणि ‘अब्राहाम माझा पिता आहे.’ अशी फुशारकी तुम्हांला मारता येईल असे समजू नका; मी तुम्हांस सांगतो की, देव अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करू शकतो. 10 झाडे तोडण्यासाठी कुऱ्हाड तयार आहे. चांगले फळ न देणारे प्रत्येक झाड कापून अग्नीत टाकले जाईल.

11 “तुम्ही तुमची अंतःकरणे आणि जीवने वाईटाकडून चांगल्याकडे बदलली आहेत हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो, पण माझ्यानंतर माझ्यापेक्षाही महान असा एक येत आहे, ज्याच्या वहाणा उचलण्याची सुद्धा माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील. 12 तो धान्य निवडायला येईल. तो भुसा बाजूला काढील व धान्य वेगळे करील. तो चांगले धान्य कोठारात साठविल व जे चांगले नाही ते जाळून टाकील. तो भुसा कधीही न विझणाऱ्या आगीमध्ये जाळून टाकील.”

योहान येशूचा बाप्तिस्मा करतो

13 तेव्हा येशू गालीलाहून यार्देन नदीकडे आला. त्याला योहानाच्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा होता. 14 पण त्याला थोपवीत योहान म्हणाला, “खरे तर मी आपल्या हातून बाप्तिस्मा घ्यायचा असे असता आपण माझ्याकडे बाप्तिस्मा घ्यायला आलात हे कसे?”

15 येशूने त्याला उत्तर दिले, “आता असेच होऊ दे. देवाची इच्छा हीच आहे म्हणून आपण असेच केले पाहिजे.” तेव्हा योहान येशूचा बाप्तिस्मा करण्यास तयार झाला.

16 येशूचा बाप्तिस्मा झाला आणि तो पाण्यातून वर आला, तेव्हा आकाश उघडले, आणि देवाचा आत्मा एखाद्या कबुतराप्रमाणे आपणावर उतरताना त्याला दिसला. 17 त्याच वेळी आकाशातून वाणी झाली की, “हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, त्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”

Footnotes:

  1. मत्तय 3:6 बाप्तिस्मा ह्या ग्रीक शव्दाचा अर्थ डुबविणे बुडविणे, एखादी व्यक्ति किंवा वस्तु अत्यल्प काळासाठी पाण्याखाली घालणे.
  2. मत्तय 3:7 परूशी यहूदी धर्ममतातील एक गट. (तेच यहुदी धर्माचे नियम व रीतिरिवाज यांचे काटेकोर पालन करतात असा त्यांचा दावा असे)
  3. मत्तय 3:7 सदूकी यहूदी धर्ममतातील एक अग्रेसर गट. जुन्या करारातील केवळ पाहिल्या पांच पुस्तकांचाच स्वीकार करणारे, मृत्युनंतर लोक पुन्हा जीवन नाही असा त्यांचा विश्वास असे.
  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes