Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

प्रमुख गायकासाठी यदूथूनाच्या चालीवरचे दावीदाचे स्तोत्र.

62 देवाने माझा उध्दार करावा म्हणून मी धीराने वाट पहात आहे.
    माझे तारण त्याच्याकडूनच येते.
देव माझा किल्ला आहे.
    तो मला तारतो.
देव माझी उंच डोंगरावरची सुरक्षित जागा आहे.
    खूप मोठे सैन्यदेखील माझा पराभव करु शकणार नाही.

किती काळ तू माझ्यावर चाल करुन येणार आहेस?
    मी एका बाजूला कललेल्या भिंतीसारखा आहे,
    केव्हाही पडणाऱ्या कुंपणासारखा आहे.
ते लोक माझा नाश करण्याच्या योजना आखत आहेत.
    ते माझ्याबद्दल खोटंनाटं सांगतात.
ते लोकांमध्ये माझ्याबद्दल चांगल बोलतात
    पण गुप्तपणे ते मला शाप देतात.

मी अगदी धीर धरुन देवाने मला वाचवण्याची वाट बघत आहे.
    देव माझी एकुलती एक आशा आहे.
देव माझा किल्ला आहे. देव मला तारतो,
    देव माझी उंच डोंगरावरील सुरक्षित जागा आहे.
माझा गौरव आणि माझा विजय देवाकडूनच येतो
    तो माझा भक्कम किल्ला आहे तो माझी सुरक्षित जागा आहे.
लोक हो! देवावर सदैव विश्वास ठेवा.
    तुम्ही देवाला तुमच्या सर्व समस्या सांगा.
    देव आपली सुरक्षित जागा आहे.

लोक खरोखरच मदत करु शकत नाहीत.
    तुम्ही मदतीसाठी लोकांवर खरोखरच विश्वास टाकू शकत नाही.
देवाशी तुलना करता ते हवेतल्या
    फुंकरीसारखे न गण्य आहेत.
10 बळजबरीने वस्तू हिसकावून घेण्यात शक्तीवर विसंबून राहू नका.
    चोरी केल्यामुळे तुमच्या पदरात काही पडणार आहे
असे समजू नका ,आणि तुम्ही श्रीमंत झाल्यामुळे तुमची श्रीमंती आता
    तुमच्या कामी येईल याचाही भरंवसा ठेवू नका.
11 फक्त एकाच गोष्टीवर भरवसा ठेवण्यासारखा आहे
    असे देव म्हणतो “शक्ती देवापासून येते.”

12 प्रभु, तुझे प्रेम खरे आहे.
    माणूस ज्या गोष्टी करतो त्या नुसार तू त्याला बक्षिस देतोस वा शिक्षा करतोस.