Add parallel Print Page Options

म्हणून मी असा निश्चय केला की, मी पुन्हा तुमची दु:खदायक अशी भेठ घेणार नाही. कारण जर मी तुम्हांला दु:ख देतो तर मला तुमच्याशिवाय आनंद कोण देईल? आणि मी तुम्हांस हे यासाठी लिहिले की, मी आल्यावर ज्यांच्यापासून मी आनंदी व्हावे त्यांच्यापासून मला दु:ख होऊ नये. मला तुम्हा सर्वांविषयी विश्वास आहे की, माझा आनंद तो तुम्हा सर्वांचादेखील आहे. कारण मी अत्यंत दु:खाने व कळवळून हे लिहित आहे पण तुम्हांला खिन्न करावे म्हणून नव्हे तर तुमच्याविषयी माझ्या मनात जी प्रीति आहे तिची खोली तुम्हांला समजावी म्हणून लिहित आहे.

ज्याने चूक केली त्याला क्षमा करा

जर कोणी कोणाला दु:ख दिले असेल तर त्याने फक्त मलाच ते दिले असे नाही, तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छित नाही. अशा मनुष्यांना सगळ्यांनी मिळून दिलेली शिक्षा पुरे. आता त्याऐवजी तुम्ही त्याला क्षमा केली पाहिजे आणि त्याचे सांत्वन केले पाहिजे. यासाठी की अति दु:खाने तो दबून जाऊ नये. मी विनंति करतो, म्हणून तुमचे त्याच्यावरील प्रेम पुन्हा व्यक्त करा. मी तुम्हांला लिहिण्याचे कारण हेच की तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्हा आज्ञाधारक राहता की नाही हे पाहावे. 10 जर तुम्ही एखाद्याला क्षमा करता तर मीसुद्धा त्याला क्षमा करीन. आणि ज्याची ज्या कशाची मी क्षमा केली आहे, आणि त्यातूनही जर काही क्षमा करण्याचे राहिले असेल-तर मी ख्रिस्ताच्या नजरेत तुमची क्षमा केली आहे. 11 यासाठी की सैतानाने आम्हांवर वरचढ होऊ नये. कारण त्याच्या योजना आम्हाला माहीत नाहीत असे नाही.

त्रोवस येथील पौलाची काळजी

12 जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेकरिता त्रोवसास आलो तेव्हा प्रभूमध्ये मजसाठी दार उघडल्यावर, 13 माझा भाऊ तीत मला तेथे सापडला नाही, म्हणून माझ्या आत्म्याचे सामाधान झाले नाही. पण तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासेदोनियास गेलो.

14 पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हांला विजयी करतो व त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध आमच्याद्धारे सगळीकडे पसरवितो. 15 कारण आम्ही, जे तारले जात आहोत व जे नाश पावत आहेत ते देवाला वाहिलेला ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत. 16 हरवलेल्यांसाठी आम्ही मरणाचा वास आहोत तर जे तारले गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही जीवनाचा सुगंध आहोत. आणि या कामासाठी बरोबरीचा कोण आहे? 17 इतरांसारखे आम्ही फायद्यासाठी देवाच्या वचनाचे काम करीत नाही. याउलट ख्रिस्तामध्ये देवासमोर आम्ही देवाने पाठविलेल्या माणसांसारखे प्रामाणिकपणे बोलतो.